नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होता. पेरणीसाठी योग्य पावसाची प्रतीक्षा करत असताना अखेर कालपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वरुणराजाने कृपा केल्याने आता शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून शेती कामांना वेग आला आहे.
जिल्ह्यात अनेक भागांत शेतकरी पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत होते. काही शेतकऱ्यांनी मात्र पावसाच्या आशेवर आधीच पेरणी केली होती. अशातच झालेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसामुळे शेतकरी आता मशागतीची कामे, पेरणी आणि इतर शेती कामे जोमाने करताना दिसत आहेत. खरीप हंगामासाठी हा पाऊस महत्त्वाचा मानला जात असून पुढील काही दिवस पावसाची साथ कायम राहिल्यास उत्पादनात वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झाले होते. मात्र पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.






