नवराज्य Live न्यूज नेटवर्क
भुसावळ : भुसावळच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मुंबईतील नंदवन येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन भुसावळच्या शिवसेना माविआ च्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, आणि निखिल संतोष चौधरी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. भुसावळात राजकीय ताकद उभी करणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
या नव्या राजकीय वाटचालीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, पाचोरा आमदार किशोर पाटील, आमदार बच्चू कडू, चोपडा आमदार चंद्रकांत सोनवणे, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील, पारोळा आमदार अमोल चिमण पाटील, उपनेत्या सरिता माळी कोल्हे आणि जळगाव जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शन व सहकार्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
अनिल चौधरी आणि गायत्री भंगाळे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणात शिवसेनेला नवी ताकद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या पक्षप्रवेशाचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो आणि कोणती नवी राजकीय समीकरणे तयार होतात, याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





