नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील पाळधी ते तेरसोड बायपास रस्त्यावर खचलेल्या ओव्हरब्रिजच्या दुरुस्तीच्या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही काळजी न घेतल्याने रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक व तवेरा वाहनाची धडक होऊन एक जण ठार, तर चौघे जखमी झाले. या प्रकरणी ठेकेदार ‘अॅरो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंघल, जी.एम. दत्ता यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अंमलदार अजय भोई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाळधी ते तरसोद फाटा दरम्यानच्या नवीन रस्त्याचे व ओव्हरब्रिजचे बांधकाम ऍग्रो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने केले आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये हे काम पूर्ण झाले. कराराच्या अटींनुसार पुढील तीन वर्षे रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची होती.
मात्र, पुलियाच्या पावसात रस्ता खचल्याने कंपनीने दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यासाठी एक लेन बंद करून दुसरीकडून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. कामाच्या ठिकाणी ‘काम सुरू आहे’ असे दर्शविणारे कोणतेही रिफ्लेक्टीव्ह बोर्ड, बॅरिकेडिंग, धोक्याचे ब्लिंकर्स अथवा रात्रीच्या वेळी वाहनचालकांना सावध करण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला नव्हता, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
तवेरातील गंभीर जखमी प्रवाशाचा मृत्यू
रविवारी रात्री सुमारे २ वाजता बायपासवर दुरुस्ती सुरू असलेल्या लेनवर ट्रक (क्रमांक एमएच ०५ डीके ५३९४) आणि तवेरा (क्रमांक एमएच ४८ पी ०७५५) यांची धडक झाली. या अपघातातील शांताराम केशव पाटील (वय ५८, रा. शेंदखेडा) हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रामचंद्र ईश्वर महाजन यांच्यासह अन्य चौघे जखमी झाले आहेत.
गुन्ह्यात कठोर कलमे
जळगाव तालुका पोलिसांनी अॅग रो इन्फ्राचे एमडी शैलेंद्र सिंघल, जी.एम. दत्ता व संबंधित साईट अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५, २९०, ३(५) तसेच मोटार वाहन कायदा व सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे.
या घटनेमुळे महामार्गावरील दुरुस्तीच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.






