नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव– शहरातील रस्ते, गटारी, जलनिस्सारण व्यवस्था आणि पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी महानगरपालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. बैठकीत शहरातील विकासकामांच्या गतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत जाब विचारण्यात आला.
शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अद्यापही दयनीय असून पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना खड्डेमुक्ती, गटार सफाई व जलनिस्सारणाच्या कामांमध्ये अपेक्षित वेग दिसून येत नसल्याबद्दल उपमहापौरांनी संताप व्यक्त केला.
बैठकीत त्यांनी रस्त्यांची सद्यस्थिती, निकृष्ट दर्जाच्या कामांवर झालेली कारवाई, पाणी साचणाऱ्या भागांवरील उपाययोजना, प्रलंबित विकासकामे, निधी खर्चाचा तपशील, नागरिकांच्या तक्रारी आणि आपत्कालीन यंत्रणेच्या तयारीबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती मागवली.
यावेळी सर्वाधिक तीव्र प्रश्न उपस्थित करत उपमहापौर मनोज सुरेश चौधरी म्हणाले की, रस्ते दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले सुमारे २१ लाख रुपयांचे डांबर, खडी व इतर साहित्य पावसाळा तोंडावर आल्यावर खरेदी करण्यामागचे कारण काय? ही प्रक्रिया दोन महिने आधी पूर्ण होणे अपेक्षित होते. आता पावसात कामे केल्यास त्याचा दर्जा आणि परिणामकारकता दोन्हीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. नागरिकांना त्रास झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?
उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की, नियोजनातील हलगर्जीपणा आणि कामातील विलंब यापुढे खपवून घेतला जाणार नाही. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळाल्याच पाहिजेत.
आगामी गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर मेहरून परिसरातील गटारीचे पाणी रस्त्यावर येण्याचा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मेहरून भागातील सांडपाणी वाहून रस्त्यावर येण्याची समस्या तातडीने सोडवावी. गणेश विसर्जन पुर्वी सांड पाणी मेहरूण तलाव मधे येता कामा नाही संबंधित कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
तसेच दरवर्षी पाणी साचणाऱ्या भागांची स्वतंत्र यादी तयार करून कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आले. विविध विभागांच्या खोदकामामुळे खराब झालेल्या रस्त्यांबाबत संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.
जळगावकरांना खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ गटारी आणि सुरळीत जलनिस्सारण व्यवस्था मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. कोणत्याही अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार असेल तर त्याबाबत कठोर भूमिका घेतली जाईल,” असा इशाराही उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी बैठकीत दिला.






