नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष तथा शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व अरविंद बंकटलाल लाठी (वय ७८) यांचे रविवारी (दि. १९ जुलै) दुपारी १२:५० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने जळगावच्या शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. अरविंद लाठी यांनी ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले.
संस्थेअंतर्गत चालणाऱ्या आर. आर. विद्यालय आणि न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रगतीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेसोबत सामाजिक बांधिलकीही जपली. ते अनिल, दिलीप आणि अविनाश लाठी यांचे ज्येष्ठ बंधू तसेच आनंद आणि अभिषेक लाठी यांचे मोठे वडील होत.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता प्रभात कॉलनीतील ‘लाठीज-२५’ या निवासस्थानातून निघणार असून नेरी नाका वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत असून लाठी कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.






