नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांना स्पष्ट शब्दांत सुनावणी करत, बीएलओंचा आढावा घेणे हे लोकप्रतिनिधींचे काम नसून त्यांच्या कामाबाबत काही तक्रार असल्यास ती संबंधित तहसीलदार, प्रांताधिकारी, महापालिका आयुक्त किंवा थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी, असे निर्देश दिले.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष पुनरीक्षण (एसआयआर) संदर्भात झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी काही बीएलओ कामावर उपस्थित राहत नसल्याची, मोबाईल बंद ठेवत असल्याची तसेच समाधानकारक काम करत नसल्याची तक्रार केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेत राहून काम करावे, असे स्पष्ट केले.
तसेच सरकारी बीएलओंनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या बॅनर, झेंडा किंवा राजकीय कार्यक्रमांच्या ठिकाणी शासकीय कॅम्प घेऊ नयेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी किंवा प्रशासनाच्या निर्देशानुसारच शासकीय कामकाज करावे, अन्यथा ते नियमभंग ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत शहरातील विविध प्रभागांमधील मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. काही भागांत कामाची गती समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले असून, संबंधित अधिकाऱ्यांना कामात गती आणण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीस महापौर दीपमाला काळे महापालिका आयुक्त आदित्य जीवने , अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, महिला व बालकल्याण सभापती सिंधू कोल्हे , उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे, प्रांताधिकारी विनय गोसावी, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.






