नवराज्य Live न्यूज नेटवर्क
धरणगाव : रिफाइंड पामोलीन तेलापासून केमिकलयुक्त कृत्रिम दूध तयार करून ते चांगल्या दुधात मिसळत विक्री करणाऱ्या प्रकरणात धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असतानाच कारवाईदरम्यान संशयित आरोपी प्रशासन अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने संपूर्ण धरणगावात चर्चेला उधाण आले आहे.
या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोराडे (वय 29) यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्टेशन येथे गु.रजि. नं. 207/2026 अन्वये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2026 कलम 26(1), 27(3), 59 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 274, 275, 123, 318 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी सोमनाथ आनंद माळी (वय 32, रा. भवरखेडा ता. धरणगाव) हा रिफाइंड पामोलीन तेलापासून कृत्रिम दूध तयार करून ते चांगल्या दुधात मिसळत असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच दुधातील फॅट कृत्रिमरीत्या वाढवून बाजारात विक्रीसाठी पुरवठा केला जात असल्याचा आरोप आहे.
अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करताना पोलिसांना का सोबत घेतले नाही?
विशेष म्हणजे कारवाई सुरू असताना संशयित आरोपीने “लघुशंकेला जातो” असे सांगत अधिकाऱ्यांच्या नजरेआड होत घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अन्न व प्रशासन विभागाने कारवाई करताना धरणगाव पोलिसांना सोबत का घेतले नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संशयित आरोपीला पडून जाण्यास प्रशासनानेच मदत केली का?
आरोपी अधिकाऱ्यांच्या हातून खरोखरच निसटला की त्याला जाणीवपूर्वक पळून जाण्यास मदत करण्यात आली? याबाबत शहरात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. या घटनेमुळे प्रशासनाच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, संबंधित आरोपीवर यापूर्वीही भेसळयुक्त दूध प्रकरणात एलसीबी आणि धरणगाव पोलिसांनी कारवाई केली होती. त्याला अटक होऊन न्यायालयीन शिक्षाही झाली होती. मात्र जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा बनावट दूध तयार करण्याचा व्यवसाय सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
भेसळयुक्त व केमिकलयुक्त दूध मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पवार व उपपोलीस निरीक्षक संतोष पवार करीत आहेत.







