नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे भविष्यात मानवी आरोग्यासमोर गंभीर प्रश्न उभा राहू शकतो. अशा परिस्थितीत मातीचे आरोग्य सुधारून अन्नाची गुणवत्ता वाढविणे अत्यंत गरजेचे असून, दुर्धर (जीवनशैलीशी संबंधित) आजार रोखण्यासाठी ‘भूमी सुपोषण अभियान’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे प्रतिपादन डॉ. निलेश चांडक यांनी केले.रावेर येथे ‘भूमी सुपोषण अभियान’ निमित्त आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मातीतील सेंद्रिय घटक कमी होत असल्याने उत्पादनाची गुणवत्ता घसरत आहे. यामुळे अन्नातील पोषकतत्त्वे कमी होऊन विविध आजारांचा धोका वाढत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती, संतुलित खत व्यवस्थापन आणि माती परीक्षण यावर भर देणे काळाची गरज आहे.जळगाव जिल्ह्यात ‘भूमी सुपोषण अभियान’ची जोरदार तयारी सुरू असून, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी देशाचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत या व्यापक अभियानाचे राष्ट्रीय पातळीवर उद्घाटन अमळनेर येथे होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या अभियानाच्या निमित्ताने अक्षय कृषी परिवारच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर शेतकऱ्यांसाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. अमळनेर येथे उद्घाटनानंतर संपूर्ण देशभरात एक महिन्याभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘भूमी सुपोषण अभियान’ राबविण्यात येणार आहे. यात माती परीक्षण शिबिरे, सेंद्रिय शेती मार्गदर्शन, शेतकरी मेळावे आणि कृषी तज्ञांचे मार्गदर्शन यांचा समावेश असेल.
यावेळी डॉ. निलेश चांडक यांनी कॅन्सर तज्ञ म्हणून आपले अनुभव मांडताना सांगितले की, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे तरुण वयातही कॅन्सरचे प्रमाण वाढत असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. भविष्यातील पिढी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने ‘भूमी सुपोषण अभियान’मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व सेंद्रिय व शाश्वत शेतीकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाच्या वेळी तालुका कृषी अधिकारी श्री. वाळके सर, मंडळ कृषी अधिकारी रावेर श्री. केचे सर, कृषी अधिकारी रावेर श्री. महाजन सर, मंडळ कृषी अधिकारी सावदा श्री. गायकवाड सर, मंडळ कृषी अधिकारी पाल श्री. काळे सर तसेच सुरेश धनके, संदिप सावळे, अरविंद देशमुख, अश्विन शैदाने, कृषी विभागातील कर्मचारी व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अभियान यशस्वी करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला







