नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – जळगाव शहर महानगरपालिका मधील कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता नियमांनुसार काम करावे, असे आवाहन उपमहापौर मनोज चौधरी यांनी केले. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी लोकप्रतिनिधी कायम उभे राहतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
महानगरपालिकेत आयोजित कर्मचारी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या बैठकीस उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे, मुख्य लेखाधिकारी व लेखापरीक्षक विजयकुमार सोनवणे, सहाय्यक आयुक्त उदय पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या आणि मागण्या मांडल्या. त्यामध्ये स्थायित्व प्रमाणपत्र देणे, अतिरिक्त कामाचा भार, निम्न पदावर असतानाही वरिष्ठ पदाची कामे करावी लागत असल्याने मोबदला मिळावा, बीएलओची अतिरिक्त जबाबदारी कमी करणे, दीर्घकाळ प्रलंबित पदोन्नती, विमा सुविधा उपलब्ध करून देणे, पगाराची निश्चित तारीख ठरवणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची एटीएम सेवा पुन्हा सुरू करणे, तसेच प्रभाग समित्यांसाठी वाहन उपलब्ध करून देणे अशा विविध मुद्द्यांचा समावेश होता.
याशिवाय २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणीही करण्यात आली.
प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की, सध्या महानगरपालिकेत सुमारे १३०० कर्मचारी कार्यरत असून कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे अनेकांना अतिरिक्त जबाबदाऱ्या द्याव्या लागत आहेत. पदोन्नती प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी असून काही पदे कालांतराने कमी झाली आहेत. नवीन भरतीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असून बिंदूनामावलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.
कालबद्ध पदोन्नती संदर्भात पहिल्या टप्प्यात ४५० कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून पुढील प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले. तसेच स्थायित्व प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकित रकमा देण्यासाठीही तरतूद केली जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
यावेळी उपमहापौर मनोज चौधरी यांनी सांगितले की, ज्या कर्मचाऱ्यांना बैठकीत आपली समस्या मांडता आली नाही त्यांनी त्या पुढील चार ते पाच दिवसांत उपमहापौर कार्यालयाकडे लेखी स्वरूपात द्याव्यात. सर्व प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.







