नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशन परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या वादाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. जुन्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी दोन्ही गटातील १० ते १२ जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी दुपारी सुमारे २ वाजता शनिपेठ चौकी परिसरात कैलास नारायण सोनवणे आणि राहुल उर्फ मोगली मोहन ठाकरे यांच्या कुटुंबीयांमध्ये लाठ्या-काठ्यांनी वाद सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना शांत केले व पुढील चौकशीसाठी त्यांना पोलीस ठाण्यात आणले.
दरम्यान, पोलीस ठाण्यात दोन्ही गटांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असताना सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता दोन्ही गट पुन्हा एकमेकांसमोर आले. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन्ही गटांमध्ये लाथाबुक्क्यांनी मारहाण व गोंधळ सुरू झाला. गोंधळ थांबविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचे समोर आले आहे. या गोंधळात पोलिसांचा एक लॅपटॉप खाली पडून त्याचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
या प्रकरणी पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी पोलिसांचे आदेश न पाळता पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी राहुल उर्फ मोगली मोहन ठाकरे, जयेश विठ्ठल सोनवणे, आशिष उर्फ पैलवान शैलेश ठाकरे, यश उर्फ सागर अशोक बाविस्कर, कैलास नारायण सोनवणे, कल्पेश कैलास सोनवणे, रोहित कैलास सोनवणे, विलास नारायण सोनवणे, सागर प्रल्हाद सोनवणे यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष दादासाहेब खेडकर करत आहेत.







