विकसित भारत’ संकल्पात महाराष्ट्राचा हुंकार !
केंद्रीय अर्थसंकल्पातून ‘आर्थिक महासत्ता महाराष्ट्र’ घडवण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल – केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे
नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला २०२६–२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा भारताला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ बनवण्याच्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल आहे. हा अर्थसंकल्प युवा शक्ती, महिला, शेतकरी आणि गरीब या चार स्तंभांवर आधारित असून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी क्रांतिकारी तरतुदी करण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले.
भाजप कार्यालय जी.एम. फाउंडेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, जळगाव महापालिकेच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, शहरजिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. पत्रपरिषदेला माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.
निर्वाचित महापौरांचा मंत्री रक्षाताई खडसे यांनी केला सत्कार.
नुकतीच पार पडलेल्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीने सत्ता स्थापन केली असून भाजपाच्या दीपमाला मनोज काळे या महापौरपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी सत्कार केला. यावेळी खासदार स्मिताताई वाघ आमदार राजू मामा घोडे दीपक सूर्यवंशी आदेशात चौधरी आदी उपस्थित होते.
मंत्री खडसे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने विक्रमी निधी दिला आहे. रेल्वे प्रकल्पांसाठी १५,९४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ही तरतूद २००९–१४ च्या तुलनेत १३ पट अधिक आहे. राज्यातील १३२ रेल्वे स्थानकांचा ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत कायापालट केला जाणार असून भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी ५२ हजार कोटींची गुंतवणूक आणि २३८ नवीन एसी लोकल गाड्या सुरू केल्या जाणार आहेत.
हवाई दळणवळण मजबूत करण्यासाठी नागपूर विमानतळासाठी ७ हजार कोटी तर शिर्डी विमानतळासाठी ६४५ कोटी रुपयांचे नवीन टर्मिनल उभारले जाणार आहे. ‘कृषी उडान’ योजनेत नाशिक व पुणे विमानतळांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. मुंबई–पुणे प्रवास ४८ मिनिटांत आणि पुणे–हैदराबाद २ तासांत पूर्ण करण्याच्या हाय-स्पीड रेल्वे योजनेमुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
युवा शक्तीच्या सक्षमीकरणासाठी पीएम इंटर्नशिप स्कीम, स्किल इंडिया, १५ हजार शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब, तसेच क्रीडा साहित्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेतून स्टार्टअप्स, MSMEs आणि सेमीकंडक्टर मिशन २.० साठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
कृषी क्षेत्रासाठी १,६२,६७१ कोटी रुपयांची तरतूद असून जळगाव जिल्ह्यात कापूस व केळी प्रक्रियेसाठी एग्रो क्लस्टर उभारले जाणार आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी SHE Marts, मुलींसाठी वसतिगृहे तसेच MACT भरपाईवरील व्याजावरून TDS माफी देण्याचा निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारा ठरेल, असे खडसे म्हणाल्या.







