नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – शहराच्या राजकीय इतिहासात अनेक निवडणुका झाल्या, मात्र नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीने एक नवा इतिहास रचला आहे. आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने जळगाव महापालिकेच्या ४६ पैकी ४६ जागांवर विजय मिळवत ‘शत-प्रतिशत भाजपा’चा नारा खऱ्या अर्थाने सत्यात उतरवला आहे.
हा विजय केवळ एका पक्षाचा नसून, तो आमदार भोळे यांच्या अफाट जनसंपर्काचा आणि गेल्या ११ वर्षांच्या विश्वासार्हतेचा ‘करिष्मा’ मानला जात आहे. २०१४ च्या काळात जळगाव महापालिका कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली होती आणि शहरात सुविधांची वानवा होती. अशा कठीण परिस्थितीत आमदार राजूमामा भोळे यांनी शहराची धुरा सांभाळली. जिद्दीने पाठपुरावा करून
महापालिकेला कर्जमुक्त करणे, नवीन एमआयडीसी मंजूर करून रोजगाराची दारे उघडणे आणि दोन भव्य उड्डाणपुलांच्या माध्यमातून शहराची वाहतूक कोंडी फोडणे, ही कामे त्यांच्या विकासपर्वाचा आधार ठरली. बायपास आणि समांतर रस्त्यांच्या कामांमुळे जळगावच्या विस्ताराला नवी दिशा मिळाली, ज्याची पावती आज मतदारांनी या ऐतिहासिक विजयाद्वारे दिली आहे.
स्वबळावर गाजवले मैदान
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण रणमैदान आमदार भोळे यांनी आपल्या कौशल्याने जिंकले. जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते इतर जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असताना आणि इतर नेत्यांचा प्रभाव मर्यादित क्षेत्रापुरता असताना, राजूमामांनी संपूर्ण शहराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मॉर्निंग वॉकपासून सुरू होणारा त्यांचा लोकसंपर्क रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. ‘प्रत्येक घरात मी प्रतिनिधी म्हणून नाही, तर कुटुंबाचा सदस्य म्हणून जातो,’ ही त्यांची भूमिका जळगावकरांच्या मनाला भिडली आणि त्याचे रूपांतर ४६ पैकी ४६ ठिकाणी विजय अशा अभूतपूर्व निकालात झाले.
विश्वासाचे राजकारण आणि कार्यकर्त्यांची साथ
राजूमामा भोळे यांनी कधीही जाती-पातीचे किंवा सूडाचे राजकारण केले नाही. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काम करणे आणि दिलेले आश्वासन प्रामाणिकपणे पूर्ण करणे, या त्यांच्या वृत्तीमुळे तरुणांपासून वृद्धांपर्यंत मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. या निवडणुकीत प्रत्येक प्रभागात मिळालेले यश हे त्यांच्या कार्यशैलीवर जनतेने मारलेली मोहोर आहे.
खऱ्या अर्थाने ‘जननायक’
प्रगत जळगाव विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेत मिळवलेले हे निर्भेळ यश जळगावच्या प्रगतीची नवी ताकद ठरणार आहे. ‘शहरातील प्रत्येक गल्लीत विकासाची गंगा पोहोचवणे आणि प्रत्येक हाताला रोजगार देणे, हेच माझे आताचे ध्येय आहे,’ असा संकल्प आमदार भोळे यांनी बोलून दाखवला आहे. या विजयाने जळगाव शहरात आता विकासाचा ‘डबल इंजिन’ वेग येणार असून, राजूमामा भोळे हे जळगावच्या राजकारणातील खऱ्या अर्थाने ‘जननायक’ ठरले आहेत.







