बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार, नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी
जळगाव तालुक्यातील देवगाव शिवारात आज सोमवारी दुपारी १२:३० च्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. इंदुबाई वसंत पाटील असे या मृत महिलेचे नाव असून, शेतात काम करत असतानाच त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती पो.पा. रमेश प्रेमराज पाटील यांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंदुबाई पाटील या देवगाव शिवारातील गट नं ५५ मध्ये असलेल्या आपल्या शेतात काम करत होत्या. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या शेजारीच काम करणाऱ्या बाळू पुना पाटील आणि रमेश पौलाद सोनवणे यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी लागलीच पोलीस पाटील रमेश पाटील यांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस पाटील आणि त्यांचा चुलत भाऊ चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहिले असता इंदुबाई पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांनी तातडीने पोलिसांना आणि वनविभागाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर इंदुबाई यांना उपचारासाठी जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने गावकऱ्यांमध्ये आधीच भीतीचे वातावरण होते. वनविभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.