खेळांमध्ये तरूणांचे भविष्य- केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे


जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे ३८ वी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन

 

जळगाव दि. ०१ प्रतिनिधी- सध्याच्या स्पर्धेच्या युगात पाल्यांमध्ये ताणतणाव निर्माण होत असतो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्वाचे म्हणजे कुठलाही खेळ होय. बुद्धिबळ सारख्या खेळात जगात दिव्या देशमुख च्या यशामुळे महाराष्ट्राची शान वाढली आहे. त्यामुळे जग भारताच्या बुद्धिमत्तेला सलाम करत आहे. मुलांनी खेळ छंद म्हणून जोपासण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी शासनस्तरावर सुद्धा स्पोर्टस पॉलिसी निर्माण केली जात असल्याचे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले.

 

जळगाव जैन हिल्सच्या भव्य अनुभूती मंडपममध्ये ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे बोलत होत्या. याप्रसंगी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर खासदार स्मिता वाघ, जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशन चे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले, जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे व जैन स्पोर्टस अॅकडमीचे अध्यक्ष अतुल जैन, कोलकता येथील आंतरराष्ट्रीय पंच देवाशीष बरूआ उपस्थीत होते.

 

दि.२ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान स्वीग लीग मध्ये खेळविण्यात येणाऱ्या ११ वर्षाखालील मुलं-मुलींच्या या बुद्धिबळ महासंग्रामाचे उद्घाटन रक्षा खडसे व स्मिता वाघ यांनी बुद्धिबळाच्या पटावर मोहरा चालवून (सेरीमोनियल फर्स्ट मूव्ह) केली. सुरवातीला मान्यवरांच्या उपस्थित दीपप्रज्वलन झाले. पाच वर्षाचा छत्रपती संभाजीनगरचा चिमुकला वल्लभ अमोल कुलकर्णी सोबत रक्षा खडसे यांनी बुद्धिबळ पटावर मोहरांच्या चाली खेळल्यात. यानंतर महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.

 

पुढे बोलताना रक्षा खडसे म्हणाल्यात की, खेळ आयुष्याचा महत्त्वाचा भाग ठरत आहे. विद्यार्थ्यांमध्ये ताण तणाव वाढत आहे. बुद्धिबळ खेळामुळे समूह व्यवस्थापन व वेळेचे नियोजन सुयोग्य करता येते परंतू शारिरीक दृष्ट्या देखील खेळाचे महत्त्व जीवनात आहेच. आयुष्यात खेळ नसेल तर बऱ्याच गोष्ट आपल्या हातून निसटून जात असतात. स्पर्धेत हार व जीत हे खेडाळूवृत्तीने स्वीकारता येते. खेळामध्ये भारताची प्रगती विलक्षण होत आहे. प्रत्येक घरांपर्यंत, प्रत्येक मुलांपर्यंत खेळ पोहचवून ऑलिम्पिकमध्ये स्थान कसे वाढेल यासाठी विशेष स्पोर्टस पॉलिसी तयार केली जात आहे. येणाऱ्या क्रीडा दिनी तीन दिवसीय प्रोत्साहनपर विविध क्रीडा विषयी उपक्रम घेतले जाणार असल्याचे सुतवाच त्यांनी यावेळी केले.

 

जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी प्रास्ताविकातून देशभरातील खेळाडूंचे स्वागत केले. भारताचे बुद्धिबळामध्ये उत्तम भवितव्य आहे. दिव्या देशमुख व कोनेरु हम्पी यांच्या यशामुळे या खेळामध्ये चैतन्य निर्माण झाले. दिव्या ही २०२२ मध्ये जळगावात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली होती याची आठवण त्यांनी सांगितली.

खासदार स्मिता वाघ यांनी २८ राज्यांतून जैन हिल्सच्या निसर्गरम्य ठिकाणी आपल्या पालकांसह आलेल्या खेळाडूंचे स्वागत करुन खेळासाठी शुभेच्छा दिल्यात. काही तरी शिकून जाऊ किंवा जिंकून जाऊ सोबत जळगावच्या आठवणी घेऊन जाऊ असे त्यांनी म्हटले.

 

महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांनी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनची स्पर्धेच्या आयोजनाबाबतची भुमिका मांडली. स्पर्धेत लिंग भेद न मानता मुलं-मुलींना समान पारितोषिके दिली जाणार आहेत, सोबतच जळगावमध्ये विशेष पॅटर्न म्हणून विजयी, पराजित व बरोबरीत खेळणाऱ्यांसुद्धा त्यांच्या मुल्यांकनानुसार पारितोषिक दिले जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय मुख्य पंच देवाशिस बरुआ (पश्चिम बंगाल) तांत्रिक सत्र घेऊन स्पर्धेक खेळाडूंना नियमावली समजावली.

राष्ट्रगिताने उद्घाटन सत्राची सांगता झाली.

 

 

(DSC04077) उद्घाटनाप्रसंगी (डावीकडून) निरंजन गोडबोले, सिद्धार्थ मयूर, अशोक जैन, रक्षा खडसे, स्मिता वाघ, अतुल जैन, देवाशीस बरुआ, अभंग जैन

(DSC04097) ३८ राष्ट्रीय ११ वर्षाखाली बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातील सहभागी बुद्धिबळपटू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here