नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – शिव सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने गॅस सिलिंडर टंचाई आणि दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी डोळ्यांवर व तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून प्रशासनाचे लक्ष वेधले.
आज, १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या या आंदोलनात गॅस सिलिंडर दरवाढ तात्काळ रद्द करावी, तसेच अघोषित तुटवडा दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे आणि तालुका प्रमुख प्रमोद घुगे यांनी सांगितले की, गॅस बुकिंग केल्यानंतर ९६ तासांत (४ दिवसांत) सिलिंडर घरपोच मिळणे बंधनकारक करावे. Jitendra Dudi (पुणे जिल्हाधिकारी) यांनी पुण्यात लागू केलेल्या नियमाप्रमाणेच व्यवस्था जळगाव जिल्ह्यातही लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
जागतिक पातळीवरील परिस्थितीमुळे गॅस दरात वाढ झाली असून, त्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करावा आणि साठेबाजीवर नियंत्रण ठेवावे, असेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात प्रा. भाऊसाहेब सोनवणे, प्रमोद घुगे, योगेश चौधरी, प्रेमराज राठोड, योगेश पाटील, डॉ. रमाकांत कदम, भगवान धनगर, किरण ठाकूर, प्रदीप पाटील, अशोक पाटील, रामदास कोळी, खुशाल अहिरे, महेश अहिरे, भीमराव पांडव, प्रमोद सोनवणे, प्रसाद पाटील, सचिन चौधरी, शांताराम उशिर आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







