नवराज्य Live न्यूज नेटवर्क
पाळधी, ता. जळगाव : इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसरा उत्सवानिमित्त रावण दहनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. कुणाल पवार, प्राचार्य गोकुळ महाजन, सावदे येथील सरपंच रंजना पवार तसेच शाळेचे अध्यक्ष इंजि. नरेश चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात शाळेतील CBSE विभागाच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक गरबा नृत्य सादर करून उत्सवाची रंगत वाढवली. तर स्टेट बोर्ड विभागाच्या विद्यार्थिनींनी लोकगीतांवर आधारित सुंदर नृत्य सादर करून भारतीय लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले. विद्यार्थिनींच्या कलागुणांना उपस्थित मान्यवरांनी दाद दिली.
यावेळी भारत विकास परिषद, भुलाबाई महोत्सव तसेच विज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. वाईट प्रवृत्तींचा नाश करून सत्य, सदाचार आणि चांगुलपणाचा विजय व्हावा, हा दसरा उत्सवाचा संदेश यावेळी देण्यात आला.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रमांची सुंदर मांडणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव यामुळे शाळेतील दसरा उत्सव आनंददायी वातावरणात पार पडला.



