नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव:‘महापौर स्वच्छता संकल्प अभियाना’अंतर्गत महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर) प्रभागात उतरून थेट पाहणी केली. वार्ड क्रमांक पाचमध्ये ठिकठिकाणी साचलेला कचरा, अस्वच्छ गटारी आणि उघड्यावरील कचरा महापौरांनी स्वच्छ करण्याचे आदेश दिले. त्यांनी उपस्थित स्वच्छता निरीक्षकांना जाब विचारत प्रभागातील कचरा स्पॉट्स तातडीने हटवण्याचे कडक निर्देश दिले.
पाहणी दौऱ्यादरम्यान जैन मंदिराची गल्ली, नवजीवन शॉप तसेच अदिती साडियाच्या मागील बाजूस कचऱ्याचे मोठे ढीग साचल्याचे निदर्शनास आले. हा भयंकर कचरा पाहून महापौरांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आणि हा परिसर तात्काळ स्वच्छ करण्याचे आदेश दिले. तसेच महापालिका इमारतीखालील खाऊ गल्लीत पसरलेली अस्वच्छता दूर करून ती पूर्ण जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले. येथील फुल विक्रेत्यांनी उघड्यावर कचरा टाकल्याचे दिसताच महापौरांनी त्यांना जाब विचारला.
“दुकानांसमोर मोठ्या कचराकुंड्या ठेवा; उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल,” अशी सक्त ताकीद त्यांनी दिली.
याशिवाय, गोलानी मार्केटमध्ये फुलांच्या लिलावामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा साठत असल्याचे लक्षात आल्यानंतर, फुलांचा लिलाव गोलानी मार्केटऐवजी दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पाहणीदरम्यान काही भागात पाण्याची नासाडी होत असल्याचे दिसून आल्याने, पाणीपुरवठा विभागाने संबंधित नागरिकांना दंड ठोठावा, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
या पाहणी दौऱ्यात वार्ड क्रमांक ५ चे नगरसेवक तथा शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, नगरसेविका मंगला चौधरी, आशा पाटील, आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले, अभियंता जितेंद्र रंधे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





