नवराज्य live न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवरामनगर परिसरात माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ निवासस्थानी झालेल्या घरफोडीचा तपास लावण्यात रामानंद नगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने मोठे यश मिळवले. तीन आरोपींना अटक करून ६ लाख २४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान मुख्य तीन आरोपी अजूनही फरार आहेत.
ही घटना २७ ते २८ ऑक्टोबरदरम्यान घडली होती. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी चेतन देशमुख यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी जियाउददीन हुस्नोददीन शेख (जळगाव), चिराग इकबाल सैय्यद (उल्हासनगर) व कैलास खंडेलवार (कल्याण) यांना अटक केली.
दरम्यान, मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला चौधरी, एजाज अहमद उर्फ सलीम चौधरी व ‘बाबा’ असे तिघे आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोिलस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, तसेच पोलीस कर्मचारी हेमंत कळसकर व गोविंदा पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले.







