नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव – केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी तर्फे आयोजित भुलाबाई महोत्सव २०२५ या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक सोहळ्याची जिल्हास्तरीय अंतिम फेरी आज (रविवार, १४ सप्टेंबर) जळगाव येथे रंगणार आहे. हा महोत्सव भैय्यासाहेब गंधे सभागृह, ला.ना. शाळा, जळगाव येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. आतापर्यंत ६७ संघांनी नोंदणी केली असून, ७ तालुक्यात पार पडलेल्या प्राथमिक फेऱ्यांमधून निवडलेले २१ विजेते संघ जिल्हास्तरीय महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. इंद्रायणी मिश्रा यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होईल. तर समारोप प्रसंगी ठाणे येथील टीजेएसबी बँकेच्या संचालिका डॉ. अश्विनी बापट प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटांमध्ये आयोजित करण्यात आल्या असून, प्रत्येक गटात मुलींचे सुमारे १२ ते १५ सदस्य सहभागी होणार आहेत. विजेत्या संघांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील, तर सर्व सहभागींना प्रमाणपत्रे आणि आयोजकांतर्फे भुलाबाई खाऊ पॅक (चिवडा व शेंगदाणा चिक्की) ‘प्रसाद’ स्वरूपात देण्यात येणार आहे.
भुलाबाई महोत्सव हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून महिला सबलीकरण, लोकपरंपरेचे संवर्धन आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव आहे. हजारो महिला व तरुणींच्या सहभागातून लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचे सौंदर्य वाढवावे, असे आवाहन ललित कला संवर्धिनीचे प्रमुख संजय हांडे तसेच भुलाबाई महोत्सव प्रमुख देवयानी कोल्हे यांनी केले आहे.






