“5G-6G काही आले तरी गुरुG शिवाय भविष्य नाही” – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी पटसंख्या वाढवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शिक्षकांना आवाहन
नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव प्रतिनीधी दि. 5 सप्टेंबर – प्रत्येकाच्या जीवनात गुरुजींचा आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचा आहे. 5G-6G काही आले तरी गुरुG शिवाय भविष्य उजळणार नाही. शिक्षकांनी बदलत्या काळात अपडेट राहणे गरजेचे आहे. मराठी शाळांचे वैभव टिकवण्यासाठी पटसंख्या वाढवणे हीच शिक्षकांची खरी जबाबदारी आहे. जि.प. शाळा म्हणजे गरीब व सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांचा आसरा असून त्यांचे भवितव्य गुरुजींच्या हातात आहे. गुरुजी हा संपूर्ण समाजाचा आदर्श आहे. विद्यार्थ्यांचे यश हेच शिक्षकांचे खरे पारितोषिक आहे. शिक्षक हा माणूस घडवणारा खरा शिल्पकार असून “आजच्या युगात शाळेला ड्रेस कोड असलाच पाहिजे. शिक्षका समाजाने एकत्र येऊन मराठी शाळांचे वैभव वाढवावे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
ला.ना. हायस्कूल येथील गंधे हॉल सभागृहात जिल्ह्यातील 15 जिल्हा परिषद शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास विनोदी, रोखठोक आणि मार्मिक शैलीत शिक्षकांना मार्गदर्शन केले.
पालकमंत्र्यांनी सांगितले की, “डीपीडीसीमधून जिल्ह्यातील शाळांसाठी मोठ्या प्रमाणावर कामे राबवली आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळांना वॉल कंपाऊंड उपलब्ध करून दिले आहे. आता 14 कोटी रुपये निधी मंजूर करून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. याशिवाय लवकरच 66 वर्गखोल्यांचे नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. ‘बाला उपक्रम’अंतर्गत 48 शाळांची निवड करण्यात येणार असून त्यालाही लवकरच मंजुरी मिळणार आहे. आपल्या नेहमीच्या गमतीशीर शैलीत पालकमंत्र्यांनी जुन्या व नव्या गुरुजींची तुलना केली. ते म्हणाले, “पूर्वीचा गुरुजी रुबाबदार असायचा. त्याच्या एका कटाक्षाने वर्ग शांत व्हायचा. आजचा गुरुजी दहा खिशांचा दिसतो.” या भाष्याने सभागृहात हशा पिकला.
यावेळी बोलतांना आमदार राजू मामा भोळे आपल्या भाषणात म्हणाले की,जळगाव जिल्ह्यात शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत नव नवीन प्रयोग सुरू आहेत. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांना संरक्षण भिंत बांधण्यासाठी उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.या मुळे शाळांना नविन स्वरूप प्राप्त झाले आहे.शिक्षण ही जीवनाची गंगोत्री आहे तसाच शिक्षक हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे या पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षकांची जबाबदारी आणखीनच वाढली आहे असेही आमदार भोळे या वेळी म्हणाले.







