नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात आज सकाळपासून रिमझिम सुरू झालेल्या पावसाने दुपारनंतर धुवाधार रूप घेतले असून संपूर्ण जिल्ह्यात संततधार कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरले, शहरातील रस्ते व बाजारपेठा पाण्याखाली गेल्या तर ग्रामीण भागात शेतमळ्यांमध्ये पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पुढील २४ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
जामनेर तालुक्यात मुसळधार पिके गेली पाण्याखाली.
जामनेर शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठात पाणी साचले होते तर शेतमळे पिके पाण्याखाली गेले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतकऱ्यांची खरीप पिके पावसाच्या पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जिल्ह्यातील पाचोरा, भुसावळ, जळगाव शहर, चोपडा, रावेर या भागात जोरदार पाऊस झाला. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून मदत पथके तैनात ठेवण्यात आली आहेत.

रेल्वे व रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम दिसून येत आहे. काही अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले असून, अनावश्यक घराबाहेर न पडण्याची सूचना दिली आहे.
हवामान खात्याचा अंदाज
पुढील २४ तासांत जळगाव जिल्ह्यात आणखी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







