|| *आत्मोत्कर्ष वाणी* ||
जीवनात ‘व्रत’, ‘प्रत्याख्यान’ आणि ‘आत्मध्यान’ आवश्यक
प्रत्येकाच्या जीवनात ‘व्रत’, ‘प्रत्याख्यान’ (त्याग) आणि ‘आत्मध्यान’ हे आवश्यक आहे. या गोष्टी असतील तरच जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. सुंदर सजावट केलेले आकर्षक पाकीट असेल, पण त्यात मोलाचा संदेश नसेल तर ते पाकीट व्यर्थ ठरते. या पर्युषण महापर्वात आध्यात्मिक ज्ञान मिळवून आत्मोत्कर्ष साधावा. अज्ञानी असणे हा उपहासाचा विषय आहे, तर ज्ञानी असणे ही सन्मानाची बाब आहे. पदोपदी ज्ञान मिळवत राहावे. राजगुरुमाता प. पू. उमरावकुंवरजी ‘अर्चना’ म.सा. यांनी जीवनात ध्यानाला विशेष महत्त्व दिले. आचार्य प. पू. शिवमुनी यांनी देखील ‘ध्यानाला’ खूप महत्त्व दिले आहे. आत्मध्यान केल्याने आत्मोत्कर्ष साध्य होतो. हे सांगताना दैनंदिन जीवनातील प्रेरक उदाहरणे देत नियम, व्रत, प्रत्याख्यान आणि ध्यानाचे महत्त्व श्रमणीसूर्या, राजस्थान प्रवर्तिनी प. पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांनी आजच्या धर्मप्रवचनात सांगितले.
सुरुवातीला प. पू. डॉ. उदितप्रभाजी म.सा. आणि प. पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांचे विचारप्रवण, प्रेरणादायी प्रवचन झाले. सुरू असलेला हा पर्युषण महापर्व आत्म्याची मॉलिश आणि पॉलिश करण्याची संधी घेऊन आला आहे. गतीसह प्रगती करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असावे. ‘प्रगती’ आणि ‘गती’ या दोन्ही संकल्पना यावेळी समजावून सांगण्यात आल्या. ‘जिथे चरण (चक्र), तिथे गती आणि जिथे आचरण, तिथे प्रगती’ ही बाब उदाहरणासह सांगण्यात आली. यासोबतच, संवत्सरीला कुणाशी कितीही विवाद किंवा मतभेद झाले असले, तरी त्याची क्षमा मागून ते संपवावे किंवा आपणच त्यांना क्षमा करावी. ‘सॉरी’ हा मोलाचा शब्द मन स्वच्छ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो, असा मोलाचा संदेश देण्यात आला. तसेच, सकारात्मक विचार म्हणजे ‘धर्म’ आणि नकारात्मक विचार ‘अधर्म’ मानले जाते. प्रत्येकाने सकारात्मक विचार करत राहावे. प्रतिकूल-अनुकूल, सुख-दुःख या परिस्थितीतून जावेच लागते. कोणतीही परिस्थिती असो, चांगलाच विचार करावा. डोके शांत ठेवावे; गरम डोके असेल तर व्याधी जडतात. मंथरासारखे नकारात्मक विचार कधीच करू नये. विचारांमध्ये स्पष्टता ठेवावी. उद्या ‘क्षमा’ याचना करा आणि इतरांना क्षमा करा, असे आवाहनही करण्यात आले.
ऑगस्ट २६: २०२५
जळगांव – महाराष्ट्र.
(शब्दांकन – किशोर कुळकर्णी.)







