रेडिओ मनभावन 90.8 एफएमचा अनोखा उपक्रम — ‘रक्षाबंधन’चा सोहळा बाल निरीक्षणगृहात प्रेमाचे धागे गुंफताना…
जळगाव- समाजात प्रेम, आपुलकी, समतेचा संदेश पोहोचवण्यासाठी आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना सन्मानाने एकत्र जोडण्यासाठी, रेडिओ मनभावन 90.8 एफएमचे संचालक अमोल देशमुख यांच्या संकल्पनेतून एक आगळावेगळा आणि मनाला स्पर्शून जाणारा ‘रक्षाबंधन’ उपक्रम बाल निरीक्षणगृहात आयोजित करण्यात आला.
“समाजातील प्रत्येक घटकासोबत नात्यांचे, प्रेमाचे धागे जपण्याची ही वेळ आहे. बाल निरीक्षणगृहातील मुलांचं बालपण जपणं, त्यांच्याशी समाज संवाद साधणं हे आपलं जबाबदारीचं काम आहे. रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहीणीचा सण न राहता, प्रेम, जिव्हाळा आणि समाजजागृतीचं प्रतीक व्हावं, यासाठी हा उपक्रम हृदयपूर्वक राबवण्यात आला,” असे श्री. अमोल देशमुख यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमात मानव सेवा विद्यालयाचे कला शिक्षक श्री. सुनील दाभाडे यांचे विद्यार्थी स्वतः बनवलेल्या सामाजिक संदेशयुक्त राख्या घेऊन बाल निरीक्षणगृहातील मुलांच्या मनात एक आनंदाची आणि आत्मीयतेची भावना जागवून गेले.बाल निरीक्षणगृहाचे प्रशासकीय अधिकारी श्री. राहुल पाटील, परीविक्षा अधिकारी राहुल भालेराव, खेळ शिक्षक जावेद तडवी, लायन्स क्लबच्या प्रेसिडेंट रेश्मा बेहरानी आणि त्यांच्या सहकारी रेखा वर्मा, विजया बाफना, चंद्रकला सुराणा, ममता टाटिया यांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष अर्थवत्ता देऊन गेली.
रेडिओ मनभावनची टीम आणि आरजे शुभांगी बडगुजर, तसेच स्वयंसेवक विद्यार्थी रुपेश बतीसे, दिव्या पवार, स्नेहल सोनवणे, ग्रीष्मा पाठक, रोहित भुजवा, यश चौधरी, जयेश वाघ, दिशा देवर, मानसी यादव यांनी प्रचंड मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
हा रक्षाबंधन सोहळा एक सामाजिक संवाद, भावनिक स्पर्श आणि सकारात्मक बदल घडवणारा अनुभव ठरला — प्रेमाचे धागे गुंफणारा, मानवी संवेदनांचा आवाज असलेला!







