नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव | प्रतिनिधी : रामेश्वर कॉलनी परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत दोन आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ३२ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि २९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ३.३० ते ३० ऑगस्ट रोजी रात्री ३.३० या कालावधीत रामेश्वर कॉलनी, जळगाव येथे घरफोडीची घटना घडली. कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीला गेला.
याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपींचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
तपासादरम्यान विशाल मनोहर ढमढेरे (वय २५, व्यवसाय मजुरी) आणि जितेंद्र मुरलीधर दाभाडे (वय २७) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघेही रामेश्वर कॉलनी परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर घरफोडी केल्याची माहिती समोर आली.
आरोपींच्या ताब्यातून सोन्याचे विविध दागिने आणि चांदीचे जोडवे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, मिनी पाटली, फॅन्सी शॉर्ट पाटली, काळेमणी पाटली, चेन, दागिना, विविध अंगठ्या आणि चांदीचे जोडवे यांचा समावेश आहे. एकूण २०८ ग्रॅम सोने व २८ ग्रॅम चांदी, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५(ए), ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील यांच्यासह पोलीस पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
अवघ्या २४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून दोन आरोपींना जेरबंद करत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याने पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे.






