नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव – नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आज रात्री १० वाजता अधिकृतरीत्या थांबणार असून त्यापूर्वीच जिल्ह्याचे राजकीय तापमान शिगेला पोहोचले आहे.
जळगाव जिल्ह्यातील १८ नागरी स्थानिक संस्थांसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत प्रचाराची रणधुमाळी संपूर्ण वेगात पाहायला मिळाली. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचे दिग्गज नेते खान्देशात दमदार प्रदर्शन करताना दिसले.
प्रचारसभांमध्ये आश्वासनांचा अक्षरशः पाऊस पडला, तर अनेक ठिकाणी आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यांमुळे वातावरण तापले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सभांना मोठी गर्दी उसळली. त्यांच्या वक्तव्यांमधून राजकीय समीकरणे कशी बदलतील याबाबत चर्चा रंगताना दिसली.
मतदारांनी सर्वांचे भाषण शांतपणे ऐकून घेतले असले तरी कोणाच्या गाडीस मतदारांची ब्रेक लागते आणि कोणाला वेग, हे ३ डिसेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील ६ शहरांमधील १२ प्रभागांची निवडणूक मात्र २० डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. तक्रारदारांच्या याचिकेवरील उशिरा झालेल्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला अतिरिक्त कसरत करावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आज रात्री प्रचारबंदी लागू होताच राजकीय घमासान शांत होईल; मात्र निकालानंतरचे राजकीय समीकरण खान्देशाच्या आगामी राजकारणाला नवे वळण देण्याची दाट शक्यता आहे.




