जळगाव – खाऊ गल्ली या उपक्रमातून नागरिकांना वर्षभर महिला बचत गटांनी बनवलेली उत्पादने उपलब्ध होणार असून, ग्रामीण महिलांच्या हातच्या पारंपरिक, सुगरणींच्या चविष्ट पदार्थांची खाऊ गल्लीमध्ये खास चव चाखता येणार आहे. महिला बचत गटांच्या आर्थिक स्वावलंबनाचे हे नवे पर्व आहे. 22 जुलै रोजी सुरू करण्यात आलेले बहिणाबाई मार्ट व खाऊ गल्ली ग्रामीण महिलांना बारमाही उत्पन्नाचा स्रोत ठरेल व त्यांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळेल,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
जळगावकरांच्या चवीला नवा रंग आणि महिला बचत गटांच्या स्वावलंबनाला नवे पंख देणारा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या पुढाकारातून आज शहरात सुरू झाला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महिला बचत गटाच्या खाऊ गल्लीचे उद्घाटन जिल्हा परिषद बचत भवन, राजकमल टॉकीजजवळ, उत्साहात पार पडले.
दिनांक २२ जुलै रोजी बहिणाबाई मार्टचे उद्घाटन करताना पालकमंत्र्यांनी खाऊ गल्ली सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या दिशेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पुढाकार घेत अवघ्या दोन महिन्यांत महिला बचत गटांच्या माध्यमातून खाऊ गल्ली साकारली.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आ. राजूमामा भोळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रनेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सरितामाळी, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महिला बचत गटांच्या सी आर पी आणि प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होते.
खाऊ गल्लीत महिला बचत गटांना स्वतंत्र स्टॉल देण्यात आले असून, नाममात्र भाड्यात नागरिकांना पारंपरिक चवीचा आनंद घेता येणार आहे. जळगावच्या मध्यवर्ती भागातील ही खाऊ गल्ली खवय्यांसाठी नंदनवन ठरेल आणि महिलांच्या स्वावलंबनाचे नवे मापदंड निर्माण करेल,” असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी व्यक्त केला.







