नवराज्य डिजिटल न्यूजनेटवर्क
जळगाव : येत्या ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून, गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. यंदा विसर्जनाचा दिवस शनिवारी येत असल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये भरले जाणारे आठवडे बाजार याच दिवशी होणार होते. गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश जारी केले आहेत.
मुंबई मार्केट अँड फेअर्स ॲक्ट १८६२ अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी ६ सप्टेंबर रोजी होणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले असून, हे बाजार इतर सोयीच्या दिवशी भरविण्याची परवानगी दिली आहे.
त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शहर व तालुकास्तरावरील शनिवारीचे आठवडे बाजार आता दुसऱ्या दिवशी भरविण्यात येतील. संबंधित महसूल व पोलीस अधिकाऱ्यांना आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.







