नवराज्य न्यूज नेटवर्क by योगेश सुने
चोपडा : राज्य शासनाने शेतीसाठी ८ ते १२ तास अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश दिले असतानाही धानोरा परिसरात शेतकऱ्यांना फक्त ६ तासच वीज दिली जात आहे. त्यातही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
धानोरा येथील विद्युत वितरण कार्यालयातील ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर किरकोळ कारणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे त्याचा लोड इतर ट्रान्सफॉर्मरवर पडत असून, शेती शिवारातील वीज फक्त ६ तासच उपलब्ध होते. वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सध्या खरीप हंगामातील कांदा व इतर पिकांची पेरणी सुरू असून, खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना दिनेश पाटील यांनी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देऊन सुधारित वेळापत्रकानुसार अखंडित वीज पुरवठा सुरू करण्याची, तसेच बंद पडलेला ट्रान्सफॉर्मर तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.
अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.







