बर्मिंगहॅम युनायटेड किंग्डम: महाराष्ट्रातील जळगावच्या भूमीतून उगम पावलेले युवा शास्त्रीय गायक दिशांत दिलीप वानखेडे यांनी आपल्या सुमधुर आवाजातील अभंगगायनाने बर्मिंगहॅम, युनायटेड किंग्डम येथे रसिकांना मंत्रमुग्ध केले. आग्रा घराण्याची परंपरा लाभलेले पं. संजय पत्की यांचे शिष्य असलेल्या दिशांत यांनी,संत ज्ञानेश्वर महाराजांसह इतर संतांच्या अभंगांचे सादरीकरण करून परदेशातील श्रोत्यांनाही भक्तिरसाचा अद्वितीय अनुभव दिला. सभागृहात उसळलेली टाळ-करतालांची लय आणि भक्तिभावाचा ओघ यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
महाराष्ट्राचे महान संत आणि भागवत धर्माचे आधारस्तंभ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाचा भव्य सोहळा बर्मिंगहॅम येथे उत्साहात पार पडला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर यूके, युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरी यूके आणि विश्वा वारकरी संस्था यूके यांनी संयुक्तपणे या सोहळ्याचे आयोजन केले.
बी पी एम हॉलमध्ये सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडलेल्या या कार्यक्रमाला स्थानिक मराठी समाजासह यूकेतील वारकरी आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती :
या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी भारताचे कॉन्सुल जनरल, भारतीय उच्चायोग बर्मिंगहॅम येथील डॉ. वेंकटचलम मुरुगन विशेषत्वाने उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक विचारांचे आणि ‘पसायदान’मधील प्रार्थनांचे महत्त्व सांगितले. तसेच, (च्लम्स्ली वुड वॉर्ड सोलिहुल, बर्मिंगहॅमचे नगरसेवक) शेष शेषभट्टर आणि (शर्ली वेस्ट, बर्मिंगहॅमचे नगरसेवक) प्रिश शर्मा यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती देऊन परदेशात भारतीय संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या समाजाचे कौतुक केले. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर यूकेचे विश्वस्त अनिल खेडकर, ह.भ.प. अनिकेत महाराज मोरे संचलित युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरी यूकेचे सागर काटकर, मयुरेश आपटे उपस्थित होते.
‘अभंगरंग’ला प्रचंड प्रतिसाद :
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले जळगावचे युवा शास्त्रीय गायक दिशांत दिलीप वानखेडे यांचे ‘अभंगरंग’ हे संगीतमय सादरीकरण. त्यांनी “अबीर गुलाल”, “अवघे गरजे पंढरपूर”, “कानडा राजा पंढरीचा” आदी अभंगांनी सभागृह भक्तिमय केले. विराज कुळकर्णी (हार्मोनियम), देवव्रत देसाई (पखवाज), आशिष कुमार (तबला), मयूर अग्निहोत्री (बासरी) यांची साथसंगत होती. कोरससाठी प्रियांका देवकर, अनुराग तळेकर, विशाखा वर्मा व राजेंद्र बने यांनी योगदान दिले. अजिंक्य धारस्कर यांनी निवेदन केले.
दिशांतची परिस्थितीवर मात…….
युकेतील रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या दिशांतची घरची परिस्थिती नाजूक असून,देखील त्याने त्याची परवा केली नाही. वडिल दिलीप सिताराम वानखेडे यांची अजय कॉलनी रिंग रोड येथे छोटीशी पान टपरी आहे. तर आई सुरेखा वानखेडे ह्या डॉ प्रशांत भूरट यांच्या हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. आई वडिलांनी मोलमजुरी करून दिशांतला शिक्षणासाठी विदेशात पाठवले. त्याने आपले शिक्षण पूर्ण करून आपला शास्त्रीय संगीताचा छंद जोपासत युकेतील रसिकांना मंत्रमुग्ध करत आहे.
समारोप :
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिभावाने पार पडला. हा सोहळा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न ठरता, संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार आणि वारकरी परंपरेचा संदेश परदेशात पोहोचविणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.







