नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : पोलीस दल व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात नुकतेच ‘श्री गणराय पुरस्कार’ वितरण करण्यात आले. गणेशोत्सवादरम्यान उत्कृष्ट आरास, शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक, सामाजिक उपक्रम तसेच नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणाऱ्या गणेश मंडळांचा यावेळी गौरव करण्यात आला.आरास स्पर्धेत आजाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला, तर विसर्जन मिरवणूक स्पर्धेत शनिपेठ मित्र मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्या मंडळांना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विसर्जन मिरवणुकीतील शिस्तीसाठी मंडळांचा गौरव
विसर्जन मिरवणुकीतील शिस्त, नियोजन आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन यासाठी मंडळांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये शनिपेठ मित्र मंडळाने प्रथम, जय गणेश मित्र मंडळाने द्वितीय, तर न्यू अचानक मित्र मंडळाने तृतीय क्रमांक मिळवला.

तर उत्तेजनार्थ पुरस्कार शिवनेरी मित्र मंडळ आणि बाबा सेवदास मित्र मंडळाला देण्यात आला.
विशेष म्हणजे, गेल्या ५० वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असलेल्या मंडळांचाही पोलिस दलातर्फे गौरव करण्यात आला.
आरास स्पर्धेतील विजेते
आरास स्पर्धेत विविध निकषांच्या आधारे मंडळांची निवड करण्यात आली. यामध्ये आजाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ प्रथम, जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळ द्वितीय, तर दीक्षितवाडी मित्र मंडळ तृतीय ठरले.

उत्तेजनार्थ पुरस्कार वज्रेश्वरीदेवी गणेश मंडळ, जिद्दी मित्र मंडळ आणि बालाजी पेठ मित्र मंडळ यांना देण्यात आला. तसेच विशेष पारितोषिक शनिपेठ मित्र मंडळाला (महेश पवार) देण्यात आले.
विविध निकषांवर करण्यात आले परीक्षण
श्री गणेश आरास स्पर्धा आणि विसर्जन मिरवणुकीतील उत्कृष्ट देखावे, उत्कृष्ट मूर्ती, स्वच्छता, मंडळांनी सादर केलेली संकल्पना, ध्वनी मर्यादेचे पालन, पोलिसांच्या सूचनांची अंमलबजावणी, मंडप व वाहतूक व्यवस्था, सामाजिक उपक्रम, दहशतवादविरोधी संदेश तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम आदी बाबींचा विचार करून मंडळांचे परीक्षण करण्यात आले.

आरास स्पर्धेचे परीक्षण महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरेसे, राजेंद्र शिंपी, सुनील दामाडे आणि शरद बारसे यांनी केले. तर विसर्जन मिरवणुकीचे परीक्षण भालेराव आणि किशोर सूर्यवंशी यांनी केले. तसेच मिरवणुकीचे परीक्षण उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापूरे, दीपक जोशी आणि राजेश शिंपी यांनी केले.
गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी मंडळांनी केलेल्या सहकार्याची दखल घेत पोलिस प्रशासनाने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला. या गौरवामुळे गणेश मंडळांच्या सामाजिक आणि विधायक उपक्रमांना निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे.






