नवराज्य Live न्यूज नेटवर्क
धरणगाव : अखिल भारतीय सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाच्या मेळाव्याचे औचित्य साधून धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील ग्रामीण साहित्यिक व कवी शरद माधवराव पाटील यांच्या ‘जगलेल्या कविता’ आणि ‘ओंजळभर स्वप्न’ या दोन काव्यसंग्रहांचे मान्यवरांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात प्रकाशन करण्यात आले. रविवार, दि. २२ रोजी धरणगाव येथे हा सोहळा संपन्न झाला.
काव्यगंध प्रकाशनच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेल्या या दोन्ही काव्यसंग्रहांचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील आणि वस्त्रोद्योगमंत्री मा. ना. संजयजी सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, जीएसटी विभागाचे ठाणे येथील डेप्युटी कमिशनर श्री. राजेशजी जाधव, मराठा उद्योजक मंडळाचे अध्यक्ष श्री. आनंदरावजी चौथे, मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष श्री. सोमनाथ भाऊ मराठे, माजी अध्यक्ष श्री. भानुदास भागवत पाटील, श्री. पी. के. पाटील, कवी शरद पाटील, धनोरा येथील सरपंच श्री. भगवान महाजन, धरणगाव पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुरेखाताई अनिल पाटील, सुरत येथील नगरसेविका सौ. मायाताई ईश्वर पाटील, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. जानकीराम पाटील, नशिराबाद येथील गणेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील साहित्यनिर्मितीचा गौरव
धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील रहिवासी असलेले कवी शरद माधवराव पाटील यांनी ग्रामीण भागात राहून आपल्या लेखणीतून समाजजीवन, दैनंदिन अनुभव, मानवी भावना आणि जीवनातील विविध पैलू प्रभावीपणे मांडले आहेत. त्यांच्या साहित्यिक योगदानाचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
‘जगलेल्या कविता’ आणि ‘ओंजळभर स्वप्न’ या दोन्ही काव्यसंग्रहांतून कवीच्या अनुभवविश्वाची, संवेदनशीलतेची आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची अभिव्यक्ती झाली आहे. ग्रामीण भागातून साहित्यनिर्मिती करणाऱ्या कवीच्या दोन काव्यसंग्रहांचे एकाच वेळी प्रकाशन होणे ही साहित्यविश्वासाठी आनंदाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रकाशन सोहळ्यामुळे साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कवी शरद माधवराव पाटील यांच्या साहित्यिक वाटचालीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर, मराठा समाजाचे पदाधिकारी, उद्योजक आणि साहित्यप्रेमींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली.





