नवराज्य Live न्यूज नेटवर्क
सावदा : अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सावदा येथील रविंद्र हिवरकर यांची जळगाव जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भुसावळ येथे आयोजित कुंभार समाज बांधवांच्या फलक अनावरण समारंभात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन जगदाळे यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
रविंद्र हिवरकर यांनी यापूर्वी कुंभार समाज सावदा शहर अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. या कार्यकाळात त्यांनी समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी विशेष पुढाकार घेतला.
समाजबांधवांना एकत्र आणणे, सामाजिक प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेणे आणि समाजाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे, या कार्याची दखल घेत संस्थेने त्यांच्यावर जिल्हा संघटकपदाची जबाबदारी सोपविली आहे.
अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कुंभार समाजाचे संघटन अधिक मजबूत करणे, समाजबांधवांमध्ये समन्वय वाढविणे, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे, अशी जबाबदारी आता त्यांच्यावर राहणार आहे.
या नियुक्तीपत्रावर संस्थेचे प्रदेशाध्यक्ष बळवंत कुंभार, राज्य उपाध्यक्ष पद्माकर शिरसाट आणि राज्य सचिव योगेश हिरवकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या कार्यक्रमाला पद्माकर शिरसाट, धनलाल शिरसाट, समाधान कुंभार, राजेंद्र खैरे, समाधान हिवरकर, जनार्दन कुंभार, मोहन सावंदे, हर्षल प्रजापती यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते.
रविंद्र हिवरकर यांच्या निवडीबद्दल सावदा शहरासह परिसरातील कुंभार समाजबांधवांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नियुक्तीमुळे समाजाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





