नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव :शहरातील विजेच्या वाढत्या आणि गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच महापालिका आणि महावितरण (MSEB) अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीला नगरसेविका जयश्री पाटील, राहुल पाटील आणि गजानन मामा देशमुख उपस्थित होते. तसेच महावितरणकडून अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे, सहाय्यक अभियंता निलेश कुरसंगे तर महापालिका विद्युत विभागाकडून विभागप्रमुख मोरे साहेब आणि कनिष्ठ अभियंता सुमित पाटील उपस्थित होते.
बैठकीदरम्यान लोकप्रतिनिधींनी शहरातील विविध वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. शहरात रात्रीच्या वेळी वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावरील स्ट्रीट लाईट रात्री बंद असतात आणि दिवसा चालू असल्याचे निदर्शनास आले.
याशिवाय शहरातील अनेक भागांमध्ये विजेच्या केबल्स अत्यंत धोकादायक अवस्थेत लोंबकळत असून, ट्रान्सफॉर्मरच्या पेट्यांवर झाकण नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी विजेचे खांब रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
नेमखेडी सबस्टेशन परिसरात वीजपुरवठ्याच्या समस्या अधिक तीव्र असून, तेथे आवश्यक मनुष्यबळाची कमतरता असल्याचेही समोर आले. तसेच तक्रार निवारण केंद्रांची उदासीनता हा देखील गंभीर मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. नागरिकांनी तक्रार नोंदवण्यासाठी फोन केल्यास अनेकदा प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली.
या सर्व समस्यांवर उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरण आणि महापालिका विद्युत विभागाला या त्रुटींवर तात्काळ दुरुस्तीची कामे सुरू करण्याच्या कडक सूचना देण्यातआल्या.




