नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील घरगुती कचरा संकलनासाठी राबविण्यात येणाऱ्या आयसीटी आधारित क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमच्या अंमलबजावणीत आढळणाऱ्या त्रुटी, अनियमितता तसेच जबाबदारी निश्चित करण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांनी आज आरोग्य विभागाची बैठक घेतली.
या बैठकीस उपायुक्त गायकवाड मॅडम, सहाय्यक आयुक्त समीर बोरवले तसेच आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. बैठकीदरम्यान उपमहापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीत पुढील मुद्द्यांवर विशेष चर्चा करण्यात आली:
1) शहरातील एकूण घरांपैकी किती घरांवर क्यूआर कोड बसवण्यात आले आहेत आणि किती घरे अद्याप वंचित आहेत, याची प्रभागनिहाय माहिती सादर करावी.
2) मागील १२ महिन्यांतील घरनिहाय क्यूआर कोड स्कॅनिंगचा संपूर्ण डेटा उपलब्ध करून द्यावा.
3) खराब, नष्ट किंवा स्कॅन न होणाऱ्या क्यूआर कोडची संख्या किती आहे आणि त्यांची पुनर्स्थापना करण्यात आली आहे का, याचा तपशील द्यावा.
4) क्यूआर कोड बसवलेले असूनही नियमित स्कॅनिंग न होणाऱ्या घरांची संख्या व त्यामागील कारणे स्पष्ट करावीत.
5) स्कॅनिंग प्रणाली कार्यरत नसल्यास किंवा मोबाईल बंद असल्यास कचरा संकलनाची नोंद कोणत्या पद्धतीने केली जाते, याबाबत माहिती द्यावी.
6) क्यूआर कोड स्कॅनिंगची दैनंदिन, साप्ताहिक व मासिक समीक्षा कोणत्या अधिकाऱ्याद्वारे केली जाते, त्यांची नावे व जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात.
7) कचरा संकलन वाहनांवरील जीपीएस प्रणाली किंवा स्कॅनर प्रत्यक्ष कार्यरत असल्याची पडताळणी कोणत्या अधिकाऱ्यांनी व किती वेळा केली, याचा अहवाल सादर करावा.
8) जीपीएस लोकेशन व क्यूआर कोड स्कॅनिंगमध्ये तफावत आढळली आहे का? असल्यास संबंधित प्रकरणांचा तपशील द्यावा.
9) संपूर्ण प्रणालीचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यात आले आहे का? असल्यास त्याचा अहवाल सादर करावा.
10) प्रत्येक घरातील कचरा डस्टबिनवर टॅग अनिवार्य असताना ते अद्याप का लावण्यात आले नाहीत, याबाबत तातडीने खुलासा करावा.
उपमहापौर मनोज चौधरी यांनी या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश दिले असून, कचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यावर भर दिला आहे.
