नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव शहरातील नागरिकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या शिव कॉलनी स्टॉप ते १०० फुटी रोड, वाघ नगर स्टॉप, पीरबाबा दर्गा आणि कोल्हे हिल्स परिसरातील रस्त्यांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उत्साहात पार पडला. शहराचे आ. राजूमामा भोळे आणि महापौर व स्थानिक नगरसेविका दीपमाला काळे उपमहापौर मनोज चौधरी स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते या कामांचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले.
राज्य शासनाच्या मागील अधिवेशनादरम्यान आ. राजूमामा भोळे यांनी जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी निधीची मागणी केली होती. शासनाकडून हा निधी मंजूर झाल्यानंतर आता या महत्त्वाकांक्षी कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
या निधीतून शिव कॉलनी स्टॉपपासून ते १०० फुटी रोडपर्यंतचा रस्ता विकसित करण्यात येत आहे. हा मार्ग संपूर्ण वाघ नगर परिसर, पीरबाबा दर्गा आणि कोल्हे हिल्स भागाला थेट गाडगेबाबा चौकापर्यंत जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील हजारो नागरिकांची दळणवळणाची मोठी सोय होणार असून वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थानिक नगरसेवक विशाल भोळे, चंद्रशेखर अत्तरदे, नगरसेविका अंकिता पंकज पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






