नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव :कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या साहित्य खरेदी व्यवहारात तब्बल १७ कोटी ७२ लाख ६७ हजार ९६४ रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. जळगाव जिल्हा रुग्णालय आणि यावल ग्रामीण रुग्णालयाशी संबंधित या प्रकरणात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव शिवाजीराव चव्हाण यांच्यासह एकूण सात जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे आरोग्य विभागाच्या तत्कालीन खरेदी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. मनोज मंगल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ०४०५/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४२० आणि ३४ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक रंगनाथ त्र्यंबक धारबळे पुढील तपास करीत आहेत.
मागणी नसतानाही साहित्य खरेदीचा आरोप
या प्रकरणाची चौकशी उपसंचालक आरोग्यसेवा, नाशिक मंडळ यांच्या स्तरावर करण्यात आली. चौकशीत ६ ऑक्टोबर २०२० ते २५ मे २०२२ या कालावधीत विविध प्रकारच्या किरकोळ साहित्याची खरेदी करताना गंभीर अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालय किंवा त्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालयांकडून साबण, टेबल क्लॉथ, झाडू, टॉर्चचे सेल, अग्निशमन उपकरणे आणि सॅनिटायझर यांसारख्या वस्तूंची मागणी नसतानाही मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या खरेदीसाठी शासनाची आवश्यक पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचेही चौकशीत नमूद करण्यात आले आहे.
निविदा प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन?
साहित्य खरेदीसाठी राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरही चौकशी समितीने आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे. टेंडर आयडी क्रमांक 2020-DHS-618773-1 अंतर्गत तीन संस्थांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी दोन संस्था अपात्र ठरल्या असताना केवळ एकच संस्था पात्र असतानाही आर्थिक निविदा उघडण्यात आल्याचा आरोप आहे.
निविदा प्रक्रियेतील नियमांचे पालन न करता नाशिक येथील ‘मे. गृहलक्ष्मी महिला औद्योगिक संस्था मर्या.’ या संस्थेला साहित्य पुरवठ्याचा कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
करारनामा नाही, सुरक्षा ठेवही घेतली नाही
संबंधित पुरवठादार संस्थेसोबत आवश्यक करारनामा करण्यात आला नसल्याचा तसेच नियमानुसार सुरक्षा ठेव जमा करून न घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय खरेदी आदेश आणि सादर करण्यात आलेल्या बिलांमधील साहित्याच्या मोजमापांमध्येही तफावत आढळल्याचे चौकशीत समोर आल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, प्रादेशिक प्रमुखांना किरकोळ खरेदीसाठी असलेल्या एक लाख रुपयांच्या वित्तीय अधिकारांच्या मर्यादेचा विचार न करता कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे.
देयक अदा करण्याच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह
जळगाव स्तरावर झालेल्या साहित्य खरेदीची देयके मंजूर करण्याचे अधिकार नसतानाही यावल ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबूलाल बारेला यांच्याकडे देयके काढण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर शासनाच्या विविध निधी शीर्षकांतून संबंधित रकमा अदा करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कर आकारणीच्या बाबतीतही अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जुलै २०१८ नंतर व्हॅट बंद झालेला असतानाही काही बिलांमध्ये व्हॅट आकारण्यात आला. तसेच विविध वस्तूंवर सरसकट १८ टक्के जीएसटी लावून शासनाचे आर्थिक नुकसान केल्याचे चौकशीत नमूद करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल झालेले सात जण
या प्रकरणात खालील सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
१. डॉ. नागोराव शिवाजीराव चव्हाण – तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव.
२. डॉ. यू. बी. तासखेडकर – तत्कालीन वैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी प्रशासकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय, जळगाव.
३. हरीपाल आर. वाणी – तत्कालीन लेखा अधीक्षक, जिल्हा रुग्णालय, जळगाव.
४. मिलिंद निवृत्ती काळे – तत्कालीन अभिलेखापाल, जिल्हा रुग्णालय, जळगाव.
५. डॉ. बाबूलाल भंगा बारेला – तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधिकारी तथा आहरण व संवितरण अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, यावल.
६. सुधाकर दगडू चोपडे – तत्कालीन सहाय्यक अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, यावल.
७. अध्यक्ष – मे. गृहलक्ष्मी महिला औद्योगिक संस्था मर्या., नांदूर, ता. व जि. नाशिक.
कोविडसारख्या जागतिक आरोग्य संकटाच्या काळात रुग्णालयीन व्यवस्थेसाठी होणाऱ्या खर्चातच इतक्या मोठ्या रकमेच्या गैरव्यवहाराचा आरोप झाल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. आता पोलीस तपासातून खरेदी प्रक्रियेतील जबाबदारी, आर्थिक व्यवहार आणि संबंधितांची भूमिका स्पष्ट होणार आहे.






