नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव: शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबाबत महापालिकेच्या महासभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापौर दीपमाला मनोज काळे यांनी उपायुक्तांना दिले आहेत.
यासंदर्भात महापौर दीपमाला काळे यांनी जळगाव शहर महानगरपालिकेचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) यांना पत्र पाठवून संबंधित विभागामार्फत करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल मागविला आहे.
महासभेत नगरसेवक तसेच नागरिकांच्या मागणीनुसार उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, या ठरावाच्या अनुषंगाने संबंधित विभागामार्फत नेमकी कोणती कार्यवाही करण्यात आली, किती विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, किती विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या तसेच उघड्यावर मांस विक्री बंद करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याची सविस्तर माहिती महापौरांनी मागविली आहे.
तसेच, ठरावाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्यास संबंधित विभागाने तात्काळ आवश्यक ती कारवाई करून उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
या प्रकरणी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल तातडीने महापौर कार्यालयास सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
महापौरांच्या या पत्रामुळे उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासन आता कोणती कारवाई करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.





