नवराज्य Live न्यूज नेटवर्क
लोहारा( प्रतिनिधी- ईश्वर खरे )- पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे शेतीच्या साहित्यांची चोरीच्या घटना सातत्याने घडत असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गत महिन्यात परिसरातील ५० शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी संकटात सापडला असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध लागत नसल्याने परिसरात नाराजी व्यक्त केली जात आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
लोहारा परिसरातील शेतांमध्ये सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने चोरट्यांनी या भागाला लक्ष्य केल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वीही अनेक शेतकऱ्यांनी लोहारा पोलीस दूरक्षेत्राकडे लेखी निवेदने देऊन चोरीच्या घटनांबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप या घटनांना आळा बसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांकडे तक्रारी करूनही चोरट्यांचा शोध लागत नसल्याने आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची आणि आंदोलन करण्याची तयारी शेतकरी करीत असल्याची चर्चा आहे.
पाणबुडी मोटार आणि २२ मीटर वायर चोरीला
लोहारा येथील रहिवासी प्रताप बळीराम चौधरी यांच्या कासमपुरा शिवारातील गट क्रमांक ६७/१ मधील शेतातील विहिरीतून पाणबुडी मोटार आणि २२ मीटर कनेक्शन वायर चोरीला गेल्याची घटना गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर रोजी घडली. या चोरीमुळे संबंधित शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी प्रताप बळीराम चौधरी यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शांतीलाल पगारे करीत आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेले साहित्य चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.
तपासाबाबत नाराजी; पोलीस गस्त वाढविण्याची मागणी
लोहारा पोलीस दूरक्षेत्रात रात्रीच्या गस्तीसाठी वाहन उपलब्ध असल्याचे सांगितले जात असतानाही चोरीच्या घटनांमध्ये घट होत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनांबाबत वारंवार तक्रारी दाखल होत असल्या, तरी चोरट्यांचा शोध लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरीच्या घटनांचा तपास वेगाने पूर्ण करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संशयित भंगार विक्रेत्यांची चौकशी करण्याची मागणी
लोहारा परिसरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रात्रीची पोलीस गस्त तातडीने वाढवावी, परिसरातील संशयित भंगार विक्रेत्यांची नियमानुसार चौकशी करावी आणि शेतातील साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी यापूर्वीही लेखी निवेदने देऊन पोलिसांचे लक्ष या समस्येकडे वेधले आहे. मात्र, चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तसेच त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी प्रभावी पावले उचलून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.






