नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : समाजातील वंचित घटकांतील लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या शासकीय निवासस्थानी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. सनिका धिवरे आणि अर्णव श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकारातून डंपिंग ग्राउंड परिसरात राहणाऱ्या तसेच कचरा वेचून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वंचित कुटुंबांतील लहान मुलांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
या उपक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः मुलांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या शिक्षणाबद्दल, कौटुंबिक परिस्थितीबद्दल आणि दैनंदिन जीवनातील अडचणींबद्दल आस्थेने विचारपूस केली. मुलांनीही त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी उपस्थित सर्व मुलांना नवीन कपडे, शूज आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. अनपेक्षितपणे मिळालेल्या या भेटवस्तूंमुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते. शासकीय निवासस्थानी मिळालेला हा प्रेमळ पाहुणचार मुलांसाठी अविस्मरणीय ठरला.
केवळ भेटवस्तूंचे वाटप न करता या मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या भवितव्याची आस्थेने विचारपूस करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांनाही आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित व्हावा, हा या उपक्रमामागील सुंदर हेतू होता.
सानिका धिवरे आणि अर्णव धिवरे यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाने सामाजिक संवेदनशीलता, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा एक सुंदर संदेश दिला आहे.







