नवराज्य Live न्यूज नेटवर्क
मुंबई :BHR मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवी ठेवलेल्या हजारो ठेवीदारांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने सविस्तर निवेदन सादर केले.
BHR मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये हजारो नागरिकांनी आपल्या कष्टाची कमाई ठेवींच्या स्वरूपात जमा केली होती. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या ठेवी अडकून पडल्याने ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह परत मिळाव्यात, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात अवसायकामार्फत करण्यात आलेल्या वसुलीचा आणि जमा झालेल्या निधीच्या वितरणाचा सविस्तर तपशील जाहीर करावा, ठेवीदारांना परतावा देण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, आजारी ठेवीदार आणि मृत ठेवीदारांच्या वारसांना प्राधान्याने मदत द्यावी, ठेवीदारांच्या तक्रारींच्या निवारणासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशा मागण्यांचाही समावेश आहे.
यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी ठेवीदारांच्या आर्थिक अडचणी आणि त्यांच्या कुटुंबांवर ओढवलेल्या परिस्थितीची सहकारमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. या प्रकरणात शासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित यंत्रणांमार्फत आवश्यक कार्यवाही करावी आणि ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशांची परतफेड होणे आणि त्यांना न्याय मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी भूमिका आमदार भोळे यांनी मांडली.
आता सहकारमंत्री या निवेदनाची दखल घेऊन BHR ठेवीदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर कोणती कार्यवाही करतात, याकडे हजारो ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.






