नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शेकडो रुग्णांवर यशस्वी उपचार करत गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणाऱ्या जळगावातील नीलकमल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने सेवेची यशस्वी १० वर्षे पूर्ण केली आहेत. अवघ्या १५ बेडपासून सुरू झालेला हॉस्पिटलचा प्रवास आज ५० बेडच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत पोहोचला आहे. आधुनिक वैद्यकीय सुविधा, आयसीयू सेवा आणि रुग्णांचा विश्वास ही या दशकभराच्या वाटचालीची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली आहेत.
गेल्या दहा वर्षांत हॉस्पिटलने आयसीयू सेवा, किडनीच्या रुग्णांसाठी डायलिसिस सुविधा तसेच विविध वैद्यकीय उपचारांच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे. शासनाच्या आरोग्य योजनांमधून पात्र रुग्णांवर उपचार करत आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक रुग्णाला समान वागणूक आणि योग्य उपचार मिळावेत, हे उद्दिष्ट ठेवून हॉस्पिटलचे कार्य सुरू आहे. या दहा वर्षांच्या वाटचालीत डॉ. मनोज रामदास टोके, डॉ. शिल्पा मनोज टोके आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे.
१५ बेडपासून ५० बेडच्या सुसज्ज हॉस्पिटलपर्यंत विस्तार; रुग्णसेवा आणि विश्वासाचा दशकभराचा प्रवास!
यावेळी माहिती देताना डॉ. मनोज टोके आणि डॉ. शिल्पा टोके यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांचा प्रवास हा केवळ हॉस्पिटलच्या विस्ताराचा नसून रुग्णांनी दाखवलेल्या विश्वासाचा आणि आशीर्वादांचा आहे. आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून शेकडो रुग्णांवर उपचार करता आले, याचे विशेष समाधान आहे. आगामी काळातही अधिक आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत माणुसकीच्या भावनेतून रुग्णसेवा सुरू ठेवण्याचा आमचा संकल्प आहे. तसेच या प्रवासात साथ देणाऱ्या सर्व रुग्णांचे, हितचिंतकांचे आणि सहकाऱ्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.







