नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव महानगरपालिका हद्दीतील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, पावसाळ्यात अपघातांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची तसेच दोषदायित्व कालावधी (Defect Liability Period – DLP) अंतर्गत संबंधित कंत्राटदारांकडूनच काम करून घेण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महानगरपालिकेने मागील काही वर्षांत केलेल्या अनेक रस्त्यांच्या कामांमध्ये विविध ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यांचा पृष्ठभागही खराब झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत असून, वाहतुकीसही धोका निर्माण झाला आहे.
नगरसेविका वैशाली पाटील यांनी महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत सर्व रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्येक कामाचे करारपत्र, कार्यादेश, पूर्णत्व प्रमाणपत्र, मोजमाप पुस्तिका (एमबी), बिल अभिलेख आणि इतर संबंधित कागदपत्रांची वस्तुनिष्ठ पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
यासोबतच प्रत्येक रस्त्याबाबत रस्त्याचे नाव, कामाचे स्वरूप, संबंधित कंत्राटदार, कार्यादेश क्रमांक, काम पूर्ण झाल्याची तारीख, दोषदायित्व कालावधी, सध्याचे दोष, आवश्यक दुरुस्ती, प्रस्तावित कार्यवाही आणि काम पूर्ण करण्याची मुदत यांची सविस्तर माहिती तयार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, ज्या रस्त्यांचा दोषदायित्व कालावधी अद्याप शिल्लक आहे, त्या रस्त्यांवरील खड्डे, तडे व इतर दोष संबंधित कंत्राटदारांकडून महानगरपालिकेवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता तातडीने दुरुस्त करून घ्यावेत. निर्धारित मुदतीत काम न केल्यास संबंधित कंत्राटदारांवर करारातील अटींनुसार दंडात्मक, प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
तसेच ज्या रस्त्यांचा दोषदायित्व कालावधी संपला आहे, त्या रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती महानगरपालिकेच्या उपलब्ध निधीतून प्राधान्याने करण्यात यावी. आवश्यक असल्यास स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करून सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन तातडीने काम हाती घ्यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने कोणत्याही बाह्य संस्थेवर किंवा कंत्राटदारांनी दिलेल्या माहितीवर अवलंबून न राहता स्वतःच्या अधिकृत अभिलेखांच्या आधारे डीएलपीची पडताळणी करावी, तसेच सार्वजनिक हित आणि वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.








