जळगाव – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘पौर्णिमा वुमन्स फाउंडेशन’च्या वतीने शहरातील पंडित नेहरू चौक, रेल्वे स्टेशन रोड येथे अभिवादन रॅली आणि मोफत अन्न-पाणी वाटप स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या अन्न-पाणी वाटप स्टॉलचे उद्घाटन जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका अंकिता पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल रवी तायडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल रवी तायडे यांनी उपस्थित महिलांशी साधलेला संवाद. आजच्या डिजिटल युगात महिला आणि बालकांनी सुरक्षित कसे राहावे, याबद्दल मार्गदर्शन करताना त्यांनी ‘सायबर सुरक्षा’या विषयावर अत्यंत मोलाची माहिती दिली. सोशल मीडियाचा वापर करताना घ्यायची काळजी आणि फसवणूक टाळण्याचे उपाय त्यांनी यावेळी समजावून सांगितले.
एकलग्न येथील अशोक शिंदे आणि त्यांच्या संचाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित भीमगीते सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी फाउंडेशनच्या वतीने सेवानिवृत्त सभासदांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पौर्णिमा वुमन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा शालिनी बिराडे, सचिव किरण वनकर,कोषाध्यक्ष किरण भालेराव
यांच्यासह फाउंडेशनच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.




