नवराज्यLive न्यूज नेटवर्क
जळगाव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे आणि मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव शहर शाखेने केली आहे. यासंदर्भात मनसेच्या वतीने अन्न व औषध प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, सात दिवसांत ठोस कार्यवाही सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मिठाई, मावा, खवा आणि फराळाच्या पदार्थांची तपासणी करा!
दिवाळीच्या काळात मिठाई, मावा, खवा, खाद्यतेल, सुकामेवा आणि फराळाच्या पदार्थांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. या काळात अन्नपदार्थांमध्ये भेसळ, अनधिकृत खाद्यरंगांचा वापर, मुदतबाह्य पदार्थांची विक्री तसेच अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थांची निर्मिती होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सतर्क राहावे, अशी मागणी मनसेने केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील हॉटेल्स, मिठाईची दुकाने, बेकरी, फराळ विक्री केंद्रे, गोदामे, शीतगृहे आणि अन्नपदार्थ उत्पादन केंद्रांची शहरी तसेच ग्रामीण भागात विशेष तपासणी करण्यात यावी. संशयित अन्नपदार्थांचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत आणि भेसळ आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
“महाराष्ट्रात कारवाई होते, मग जळगावात का नाही?”
महाराष्ट्रातील इतर भागांत भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात असताना जळगावात अपेक्षित कारवाई का होत नाही, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर पुराव्यांच्या आधारे समान निकषांनुसार कारवाई करावी. तसेच अन्नपदार्थांचे परवाने, नोंदणी, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम मुदत आणि साठवणुकीच्या नियमांची काटेकोर तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्री व साठवणुकीविरोधातही संबंधित कायद्यांनुसार कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.
सात दिवसांत तपासणी मोहीम सुरू करा; अन्यथा आंदोलन!
निवेदन प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत विशेष तपासणी मोहीम सुरू करून केलेल्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा. तपासणी केलेल्या आस्थापनांची संख्या, घेतलेले नमुने, जप्त केलेला साठा आणि करण्यात आलेल्या कारवाईची माहिती नागरिकांसाठी अधिकृतरीत्या प्रसिद्ध करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी जळगाव अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी निवेदनाची दखल घेत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. निर्धारित कालावधीत तपासणी मोहीम सुरू झाली नाही किंवा मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.
मनसेचे पदाधिकारी उपस्थित
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक, संजय मोती, राहुल चव्हाण, दीपक राठोड, खुशाल ठाकूर यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.







