नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव | प्रतिनिधी : पाळधी–तरसोद बायपास बंद झाल्यानंतर जळगाव शहरातून वळविण्यात आलेल्या अवजड वाहतुकीमुळे महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून, अवघ्या काही तासांत पाचव्या नागरिकाचा बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक अरविंद देशमुख यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) मुंबई प्रादेशिक कार्यालयाला अत्यंत तातडीचे पुरवणी निवेदन पाठवून तातडीने विशेष पथक जळगावात पाठविण्याची मागणी केली आहे.
देशमुख यांनी २४ ऑगस्ट रोजी NHAI कडे निवेदन देऊन “चार बळी गेल्यानंतर आता पाचव्या बळीची वाट पाहू नका,” असा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतर काही तासांतच आणखी एका नागरिकाचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे “मी काल ज्या पाचव्या बळीची भीती व्यक्त केली, ती अवघ्या काही तासांत वास्तवात उतरावी, यापेक्षा गंभीर आणि वेदनादायी बाब दुसरी कोणती असू शकते?” असा सवाल त्यांनी पुरवणी निवेदनातून उपस्थित केला आहे.

पाळधी–तरसोद बायपास बंद झाल्यानंतर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतुकीचा मोठा भार वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावरील खड्डे, खचलेल्या व असमतोल साईडपट्ट्या, धोकादायक ठिकाणे, अपुरी प्रकाशव्यवस्था तसेच चेतावणी फलक व रिफ्लेक्टरचा अभाव याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही संबंधित यंत्रणेची मूलभूत जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
NHAI चे विशेष पथक जळगावात पाठविण्याची मागणी
देशमुख यांनी NHAI च्या वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांचे विशेष पथक तातडीने जळगाव येथे पाठवून प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी केली आहे. जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे स्वतंत्र Road Safety Audit करून अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
तसेच महामार्गावरील खड्डे, खचलेल्या साईडपट्ट्या, धोकादायक उंचवटे व इतर त्रुटींची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी. बायपास पूर्ण क्षमतेने सुरक्षितपणे सुरू होईपर्यंत शहरातील महामार्गावर २४ तास रोड सेफ्टी व आपत्कालीन देखभाल पथक तैनात करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रणाची मागणी
पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग करावे, रिफ्लेक्टर, चेतावणी फलक, स्पीड लिमिट बोर्ड, रम्बल स्ट्रिप्स आणि प्रकाशव्यवस्था तातडीने उभारावी, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.
दरम्यान, पाळधी–तरसोद बायपासवरील पुलाचा भराव खचण्याची घटना तसेच बायपास बंद केल्यानंतर शहरातील पर्यायी महामार्गावर पुरेशा पूर्वसुरक्षा उपाययोजना न केल्याची बाब या दोन्हींची स्वतंत्र उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“आता सहाव्या बळीची वाट पाहणार आहात का?”
“काल मी लिहिले होते, पाचव्या बळीची वाट पाहू नका. दुर्दैवाने आज पाचवा बळीही गेला. आता सहाव्या बळीची वाट पाहणार आहात का?” असा संतप्त सवाल अरविंद देशमुख यांनी NHAI प्रशासनाला केला आहे.
या पुरवणी निवेदनाची अत्यंत तातडीने दखल घेऊन ४८ तासांच्या आत प्रत्यक्ष उपाययोजना सुरू कराव्यात आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यापुढे आणखी एखादा निष्पाप जीव गमावला गेल्यास, यापूर्वी दिलेल्या सूचना व इशाऱ्यांची कागदपत्रे सादर करून केंद्र शासन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय तसेच संबंधित सक्षम यंत्रणांकडे दाद मागण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.
“जळगावकरांचा जीव स्वस्त नाही. पाच बळी पुरे झाले; आता आणखी एकही बळी नको!” असे म्हणत देशमुख यांनी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.








