नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव महानगरपालिका हद्दीतील विविध दुभाजक (डिव्हायडर) विकसित करण्यासाठी मनपाने ठराविक नियम व अटींसह सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था (NGO) तसेच इच्छुक संस्थांना कराराच्या माध्यमातून परवानगी दिली होती. मात्र या नियमांचे उल्लंघन करून लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर अखेर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत ते हटवले.
मनपाने डिव्हायडर विकसित करताना जाहिरात फलकांसाठी काही स्पष्ट निकष निश्चित केले होते. त्यानुसार दोन जाहिरात फलकांमध्ये किमान १० मीटर अंतर ठेवणे, जाहिरात फलकांपैकी ४० टक्के जागा मनपाच्या जनजागृती अथवा सार्वजनिक हिताच्या संदेशांसाठी राखीव ठेवणे आणि उर्वरित ६० टक्के जागेवर संबंधित संस्थेची जाहिरात करण्याची मुभा देण्यात आली होती. तसेच सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जाहिरात फलक लावण्यापूर्वी महानगरपालिकेची आवश्यक परवानगी (NOC) घेणे बंधनकारक करण्यात आले होते.
मात्र काही ठिकाणी या अटींचे पालन न करता फलकांमधील आवश्यक अंतर न ठेवणे, संपूर्ण जागेवर व्यावसायिक जाहिराती प्रदर्शित करणे आणि आवश्यक परवानगी न घेता फलक उभारण्यात आल्याची तक्रार मनपा प्रशासनाकडे करण्यात आली होती.
तक्रारीची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने संबंधितांना नियमबाह्य फलक स्वतःहून हटविण्यासाठी मुदत दिली होती. मात्र दिलेल्या मुदतीत कार्यवाही न झाल्याने अखेर मनपाच्या अतिक्रमण विभागाने संबंधित नियमबाह्य जाहिरात फलक हटविण्याची कारवाई केली.
शहरात अनधिकृत जाहिराती, मोठे फलक व बॅनर यांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे नियमांचे पालन आणि शहराच्या सुशोभीकरणाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








