नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव :जळगाव शहरात सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. एका बाजूला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांनी विठ्ठलनामाच्या गजरात भक्तिरसाचा आनंद लुटला, तर दुसऱ्या बाजूला केसी पार्क परिसरात श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने महिला व बालकांच्या सहभागातून भव्य वृक्षारोपण व ‘वृक्ष दिंडी’चे आयोजन करण्यात आले.
चिमुकल्यांचा विठ्ठलनामात भक्तिमय सहभाग
आषाढी एकादशीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. विठ्ठलाच्या नामस्मरणाने परिसर भक्तिमय झाला. चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीचा संदेश दिला.
यावेळी इशान्वी आशिष भिरूड हिने रुक्मिणीची वेशभूषा साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या हस्ते पूजन करण्यात आले. दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या बालकांच्या उत्साहामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
केसी पार्कमध्ये ‘वृक्ष दिंडी’तून पर्यावरण जनजागृती
दरम्यान, श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने केसी पार्क येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेली ‘वृक्ष दिंडी’ महिला, बालके आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने पार पडली.
हातात विविध वृक्षांची रोपे, पर्यावरण जनजागृतीचे फलक आणि “झाडे लावा, झाडे जगवा”, “एक वृक्ष – एक जीवन” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली.
वृक्ष संवर्धनाची घेतली शपथ
कार्यक्रमात उपस्थितांनी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. संस्थेचे अध्यक्ष सुनील वाणी यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत, “आज लावलेला प्रत्येक वृक्ष ही पुढील पिढ्यांसाठी दिलेली अमूल्य भेट असून, त्याचे संगोपन करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे,” असे सांगितले.
या कार्यक्रमाला सुनील वाणी, सोनाली वाणी, दुर्गा पाटील, तेजस्विनी, भूषण लाडवांजारी यांच्यासह महिला, बालके आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यातही पर्यावरण संवर्धनासाठी अशाच सामाजिक उपक्रमांचे सातत्य राखण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








