नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जामनेर – शहरातील मदनी नगर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा जामनेर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा करत तीन आरोपींना ताब्यात घेत तब्बल ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मसूद अख्तर मुजफ्फर हुसेन (वय ५०, रा. मदनी नगर, जामनेर) हे कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील सुमारे ९ लाख २३ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने तसेच ४ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित शेख समीर ऊर्फ बाल्या शेख जाकीर (वय २४) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी मोहम्मद फातीर ऊर्फ गोलू मिया तुफैल मोहम्मद (वय २०) तसेच शेख अमीर शेख जाकीर (वय १९) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून ३०.०१ ग्रॅम सोन्याचे दागिने, १२ भार चांदीचे दागिने, रोख रक्कम, तसेच तीन मोबाईल असा एकूण ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलिसांनी केली.






