नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – नूतन मराठा महाविद्यालय व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांमधील 24 गुणवंत विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 8 शाळांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन विज्ञान भारतीचे जिल्हा समन्वयक डॉ. माधुरी पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सौ. संगीता जगदाळे यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रार्थनेने झाली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. एल. पी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत विज्ञान क्षेत्रातील संधींचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या इस्रोच्या ऑनलाइन सेंटरचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात भर घालावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यक्रमात विज्ञान भारतीच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. भविष्यात या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक वाढवावा, असे आवाहन आयोजकांनी केले.
यावेळी VVMचे राज्य समन्वयक श्री. संदीप पाटील व श्री. अमोल कुंभारकर यांनी LCD प्रोजेक्टरच्या सहाय्याने परीक्षेची रचना, तयारी व संधी याविषयी सखोल माहिती दिली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. आर. बी. देशमुख यांनी मोलाचे सहकार्य केले.







