शिरसोली (प्रतिनिधी) – मेहनत, जिद्द आणि शिक्षणाच्या बळावर ग्रामीण भागातील युवकही मोठे यश संपादन करू शकतात, हे शिरसोली येथील शुभम देविदास ताडे (बारी) यांनी सिद्ध करून दाखवले आहे. प्रगतशील शेतकरी देविदास सखाराम ताडे (बारी) यांचा सुपुत्र शुभम याने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ही प्रतिष्ठित पदवी प्राप्त करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
देविदास ताडे हे फुलांची तसेच विड्याच्या पानांची शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतीवर अवलंबून असतानाही त्यांनी आपल्या मुलाला उत्तम शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्याच मेहनतीचे फळ म्हणून शुभमने सीए ही कठीण परीक्षा उत्तीर्ण करत मोठे यश मिळवले आहे.
एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याच्या मुलाने सीएसारखी उच्च पदवी मिळवल्याने परिसरातील शेतकरी व युवकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे. शुभमच्या या यशाबद्दल गावकऱ्यांसह समाजातील विविध स्तरांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शुभम ताडे यांच्या यशामुळे शिरसोली गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





